- संतोष येलकरअकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील २०१८-१९ या वर्षातील कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील विविध यंत्रणांच्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १९५ ग्राम साधन व्यक्तींकडून ‘नरेगा’ अंतर्गत यंत्रणांच्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे.शासनाच्या ग्रामविकास विभाग व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीनही तालुक्यांत ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांच्या कामांची पाहणी ग्राम साधन व्यक्ती व नियंत्रण पथकांमार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी १९५ ग्राम साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाहणीत पथकांकडून ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांची संपूर्ण माहिती घेण्यात येणार आहे. येत्या १३ सप्टेंबरपर्यंत तीनही तालुक्यांत ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार असून, त्यामध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभा आणि शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. संबंधित तीन तालुक्यांतील सोशल आॅडिट पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित चार तालुक्यांतही ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ होणार आहे. या सोशल आॅडिटमध्ये जिल्ह्यातील ‘नरेगा’ अंतर्गत यंत्रणांमार्फत करण्यात आलेली कामे, त्यावर झालेला निधी खर्च आणि सद्यस्थितीचे वास्तव समोर येणार आहे.‘या’ कामांचे होणार ‘सोशल आॅडिट’!नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षात नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे.
प्रत्येक तालुक्यात ६५ ग्राम साधन व्यक्तींची नियुक्ती!नरेगा अंतर्गत कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांच्या कामांचे आॅडिट करण्यासाठी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ) व जिल्हा ग्राम साधन व्यक्ती (सोशल आॅडिटर)मार्फत प्रत्येक तालुक्यात ६५ ग्राम साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत नरेगा अंतर्गत संबंधित तालुक्यातील कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे.अहवालावर होणार जनसुनावणी!नरेगा अंतर्गत कामांच्या सोशल आॅडिटमध्ये ग्रामपंचायतनिहाय विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांची पाहणी आणि माहिती घेतल्यानंतर, सोशल आॅडिटचा अहवाल ग्रामसभामध्ये सादर करण्यात येणार आहे. या अहवालावर तालुका स्तरावर जनसुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर सोशल आॅडिटचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.