लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (एनएएस) अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवीच्या प्रत्येकी ६१ वर्गांचे आणि इयत्ता आठवीच्या ५१ वर्गांचे (राष्ट्रीय संपादणूक चाचणी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एनसीईआरटीने सर्वेक्षणासाठी शाळांची निवड केली आहे. या सर्वेक्षणांतर्गत निवडलेल्या शाळेतील वर्गामध्ये १३ नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेत ऑबजेक्टिव्ह, एमसीक्यू पर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्यात येतील. इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांना भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र या तीन विषयांवर आधारित ४५ प्रश्नांची चाचणी घेण्यात येईल. तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र, सामाजिकशास्त्र या चार विषयांवर ६0 प्रश्न विचारण्यात येतील. चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम राहणार नसून, सर्व प्रश्न इयत्तेनुसार क्षमतांवर आधारित राहणार आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना चाचणीच्या एक दिवस अगोदर शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून प्राप्त होतील. निवडलेल्या वर्गातील ३0 विद्यार्थ्यांंसाठी ही चाचणी होईल. मात्र, वर्गाची पटसंख्या ३0 पेक्षा अधिक असेल, तरीही चाचणीला १00 टक्के उपस्थिती राहील. याची खबरदारी मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे. निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेने घेऊन चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यायचे आहेत.
चाचणीसाठी राहतील भरारी पथकेएनएएसच्यावतीने घेण्यात येणार्या चाचणीसाठी जिल्हा स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकात प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश राहील. चाचणीच्या दिवशी हे भरारी पथक जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देईल.
चाचणीतून काय साध्य होईल?चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी राज्य स्तरावर ओएमआर पद्धतीने होणार असून, तालुकानिहाय निकाल एनएएसच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल. जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल.
एनसीईआरटीमार्फत जिल्हय़ातील शाळांमधील इयत्ता तिसरी ते पाचवी आणि आठवीच्या निवडक वर्गांंची चाचणी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंची गुणवत्ता आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून ही चाचणी होणार आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारीप्राथमिक विभाग