नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या १९ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत रविवारी झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड आणि हरियाणाच्या बॉक्सरांनी दबदबा निर्माण केला. महाराष्ट्राच्या अजहर अली, जिब्रान, अजय पेंदोर, आकाश, सागर, राहिल सिद्धीकी, साकिब, ऋषभ, रोहण आणि मोन्टीने आपल्या वजन गटात विजय मिळविला आहे. ६0 किलो वजन गटात महाराष्ट्राच्या आकाशची लढत दमन आणि दीवच्या हितेश सोबत झाली. या लढतीत आकाशने आपल्या ठोश्याचा जोर आजमावत ४-१ अशी गुणांच्या आधारावर लढत जिंकली. ६४ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या सागरचा सामना मध्य प्रदेशच्या हिरेंद्र सोबत झाला. यामध्ये देखीलसागरने ४-१ ने विजय मिळविला. ६९ किलो वजन गटात ओडिशाचा अमन आणि महाराष्ट्राच्या राहिल सिध्दीकी यांच्यात लढत झाली. मात्र, अमनने पहिल्याच फेरीत खेळण्यास नकार देऊन, पंचाना लढत थांबविण्याची विनंती केली. यामुळे राहिलला पंचांनी विजयी घोषित केले. ७५ किलो वजनगटात दमन आणि दीवचा ऋषभ आणि महाराष्ट्राचा साकीब यांच्यात प्रेक्षणीय लढत झाली. गुणांच्या आधारावर साकीबने १-४ ने लढत जिंकली. ४६ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या अयुब याने गोव्याच्या समीरचा पराभव केला. ४९ किलो वजनगटात छत्तीसगडच्या इंद्रजितला महाराष्ट्राच्या अजय पेंदोरकडून पराभवाला सामोरे जावे लागले. ५२ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या अजहर अली याने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत तामिळनाडूच्या लोगेशला धूळ चारली. ५६ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या जिब्रान खानने आयपीएससीच्या इशदत्तचा पराभव केला. ८१ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या ऋषभने हरियाणाच्या मनिंदरला पराभूत केले. ९१ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या रोहणने केंद्रीय विद्यालय संघटनच्या राजेंद्रचा पराभव केला. ९१ किलोच्या वर वजनगटात महाराष्ट्राच्या मोन्टीने गोव्याच्या जोशवाचा पराभव केला.
तेलंगणाच्या रईसचा आरोपमहाराष्ट्र आणि हरियाणाच्या बॉक्सरांना या स्पर्धेत जिंकविण्यासाठी इतर राज्याच्या खेळाडूंना लढती दरम्यान डावलले जात असल्याचा आरोप तेलंगणाचा स्टार बॉक्सर मो. रईस याने केला. ४६ किलो वजनगटात हरियाणाच्या अनफिट लकी सोबत लढत झाली. दोन-तीन वेळा तो पडला. याबाबत तांत्रिक समितीकडे तक्रार केली असता, त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशिक्षक प्रसाद, मनोज तसेच पालक मो. सलीम यांनी केला. तांत्रिक समिती व आयोजन समितीकडे यासंदर्भात विचारले असता, तांत्रिक समितीकडून याबाबत बैठक बोलविण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’जवळ सांगितले.