अकोला : स्थानिक दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउन्टन्टस आॅफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्यावतीने ११ आणि १२ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला दिल्ली, मुंबई आणि अहमदनगर येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांची हजेरी राहणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात येथील जवळपास ७५० सीए आणि या क्षेत्राशी संबंधित मान्यवर प्रामुख्याने येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सीपीई कमिटी दिल्लीच्या ए.के. श्रीप्रिया यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत असून, कार्यक्रमाचे समन्वयक उमंग अग्रवाल, आनंद जाखोटिया, सचिन लाठी, जितेंद्र खंडेलवाल, अजय जैन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सोबतच राष्ट्रीय स्तरावरील जवळपास सात पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने हजेरी लावणार आहेत, अशी माहितीदेखील देण्यात आली. ‘जीएसटी आॅडिट व आर्थिक पत्रक’ या विषयावर दिल्ली येथील विमल जैन, ‘जीएसटी अंतर्गत क्रेडिट आणि संशोधन’ या विषयावर दिल्ली येथील अशोक बत्रा, ‘जीवनाचे ताळेबंद’ या विषयावर अहमदाबाद येथील ज्ञानवत्सल स्वामी, मुंबई येथील मुकुंद चितळे, राजेंद्र आणि डॉ. गिरीष आहुजा यांचे व्याख्यान होणार आहे. सोबतच मुख्य आॅडिटर प्रकाश भंडारी, घनश्याम चांडक, हिरेन जोगी, भरत व्यास, मिथुन टेकाडे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सुधीर भोला, भुवन मोहिनी, प्रशांत अग्रवाल प्रामुख्याने हजेरी लावणार आहेत.या परिषदेत अकोला, अमरावती, पुणे, परभणी, नांदेड, जळगाव, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, छिंदवाडा, बºहाणपूर आदी ठिकाणचे सीए देखील बहुसंख्येने सहभागी होत आहेत, अशी माहितीदेखील देण्यात आली. पत्रकार परिषदेला अकोला सनदी लेखापाल शाखेचे अध्यक्ष उमेश अग्रवाल, रमेश चौधरी, केयूर डेडिया, भरत व्यास, हिरेन जोगी, मीना देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.