डॉ.किरण वाघमारे /अकोलाकेंद्रीय मंत्रिपद नितीन गडकरी यांना आणि मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याबरोबर विदर्भात विकासाची गंगा वाहू लागली आहे. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांची उभारणी विदर्भात होऊ लागली आहे; परंतु विकासाची ही गंगा पूर्व विदर्भातच का? पश्चिम विदर्भात या विकासरूपी गंगेचा प्रवाह कधी येणार? याची प्रतीक्षा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील रहिवाशांना आहे. आज दोन्ही नेत्यांच्या कृपेमुळे नागपूर हे नवीन ह्यएज्युकेशन हबह्ण म्हणून उदयाला येत आहे; परंतु त्याचवेळी पश्चिम विदर्भाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली आहे. महाराष्ट्राचाच भाग असलेल्या विदर्भाला मागील अनेक वर्षांपासून उपेक्षाच सहन करावी लागली. सर्व परिस्थिती अनुकूल असतानादेखील केवळ राजकीय उदासीनता यामुळे विदर्भाला उपेक्षेचे चटके सहन करावे लागत आले; परंतु दोन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तापरिवर्तन झाले आणि विदर्भाचे भाग्य उजळले. नितीन गडकरींच्या रूपाने एक वजनदार खात्याचा मंत्री केंद्रात गेला आणि त्यांनी विदर्भाची उपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला. गडकरींच्या पाठोपाठ राज्यात मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि विदर्भाच्या विकासाला गती मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नातून अनेक संस्था विदर्भात उभ्या राहू लागल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल लॉ स्कूल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्था या मागील दोन वर्षांत सुरू झाल्या आहेत. नॅशनल अँकेडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल फायर इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट या संस्था पूर्वीपासूनच नागपुरात आहेत. याशिवाय जुन्याच असलेल्या विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीला आय.आय.टी. चा दर्जा मिळाला आहे. या सर्व शैक्षणिक संस्थांमुळे नागपूर आता 'एज्युकेशन हब' झाले आहे. पूर्व विदर्भात राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जात असताना पश्चिम विदर्भ मात्र दुर्लक्षित आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संस्था पूर्व विदर्भातच का?
By admin | Published: May 28, 2016 1:59 AM