अकोला : शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत २० दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले असून शुक्रवारी भीक मांगो आंदोलन केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी गत २० दिवसांपासून आंदोलन करत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएम अंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.