बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्यांमुळे मंगळवारी बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ बस कंटेनरवर आदळल्याने १२ प्रवाशी जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रिधोरा येथे बसच्या धडकेत एक जण ठार झाला होता तर सोमवारी शिवशाहीच्या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले होते.नागपूरवरून औरंगाबादकडे बस क्र. एमएच २० बीएफ ३०३५ जात होती. दरम्यान, बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ ब्रेक न लागल्याने ही बस सरळ कंटेनर क्र. एमएच १२ एफझेड ९५६२ वर आदळली. त्यामुळे, बसमधील देवराव पूर्णाजी वानखडे, संध्या दे. वानखडे रा. अकोला, वासुदेव चाहदेव लोखंडे, संजय जारे, चेतन राठोड, सचिन लोखंडे सर्व रा. टिटवा, शे. मस्तान शे. अमीर रा. पुसद, सुषमा दारासिंग आडे चिखली, जयकुमार गावंडे रा. लाखनवाडा जि. अकोला यांच्यासह १२ प्रवाशी जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर काही प्रवाशांना सुटी देण्यात आली तर गंभीर जखमींना सर्वोपचार रुग्णालयात अकोला येथे हलवण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यापूर्वी रिधोरा येथे ३० सप्टेंबरला अपघातात एक ठार, एक गंभीर तर १ आॅक्टोबरला व्याळा जवळ शिवाशाहीच्या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले होते. २ आॅक्टोबरला नागपूर-औरंगाबाद बस चालकाने कंटेनरला धडक दिल्याने १२ प्रवाशी जखमी झाले. हे तिन्ही अपघात बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)