अकोला: मुंबई ते कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचा कंत्राट ‘आयएल अॅण्ड एफएस’ कंपनीला दिला होता. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे महामार्गाच्या दुुरुस्तीचे काम प्रभावित झाले होते. काम रखडल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात येऊन नव्याने निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वाडेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते.२०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येताच दळणवळणाच्या सुविधेसाठी संपूर्ण देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम हाती घेण्यात आले. ही बाब विरोधकही खासगीत मान्य करतात. देशभरातील मोठ्या शहरांना जोडण्याच्या उद्देशातूनच मुंबई ते थेट क ोलकातापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्याचा कंत्राट ‘आयएल अॅण्ड एफएस’ कंपनीला देण्यात आला होता; परंतु ही कंपनी डबघाईस आल्याने कंपनीसोबतचा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. याव्यतिरिक्त अकोला, वाशिम, हिंगोली ते नांदेडपर्यंत १७२ किमी रस्ता दुरुस्तीसाठी अडीच हजार कोटींची निविदा निघाली आहे. येत्या दीड-दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.६५ वर्षांत कोणाची गरिबी हटविली?देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गरिबी हटविण्याचा नारा दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरू यांचे पणतू राहुल गांधी यांनीसुद्धा गरिबी हटविण्याचा नारा दिला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामपंचायतपासून ते केंद्रापर्यंत ६५ वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतरही काँग्रेसकडून गरिबी हटविण्याचा नारा दिला जातो, ही शोकांतिका असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केली.विरोधकांना जोरदार ‘करंट’ लागेल!देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थानापन्न होईल. त्या दिवशी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीला जोरदार करंट लागेल, असा मार्मिक टोला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लगावला.