अकोला : सिकलसेलवर नियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय सिकलसेल मिशन हाती घेण्यात आले असून, २७ जूनपासून शहरी व ग्रामीण भागात सिकलसेलची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत तरुणांमध्ये सिकलसेलविषयी जनजागृती तसेच सिकलसेल तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली.
तरुणांमध्ये सिकलसेलविषयी जनजागृती व्हावी तसेच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळावे, यानुषंगाने राष्ट्रीय सिकलसेल मिशन देशभरात राबविण्यात येणार आहे. या मिशनचे उद्घाटन २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यक्रमांबाबत पोर्टल, प्रशिक्षण साहित्य आणि जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या आधारावर तरुणांमध्ये जनजागृतीसोबतच तालुकास्तरावर, तसेच सर्वोपचार रुग्णालयात सिकलसेल तपासणी मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयात होणार तपासणी
राष्ट्रीय सिकलसेल मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पाचही ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल तपासणीची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तपासणीदरम्यान प्रत्येकाचे समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
तरुणांमध्ये करणार जनजागृती
सिकलसेल आजाराविषयी युवा पिढीला माहिती व्हावी, तसेच लग्नापूर्वी त्याच्या तपासणीची का गरज आहे. याविषयी तरुणांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. तसेच ज्यांच्या कुटुंबात सिलसेलचा रुग्ण किंवा वाहक आहे, अशा तरुणांची सिकलसेलची तपासणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राष्ट्रीय सिकलसेल मिशनसंदर्भात शासनस्तरावरून सूचना प्राप्त झाली आहे. त्यानुसार, २७ जून राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मिशनचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला