अकोला: राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे. दहावीतील विद्यार्थ्यांसाठी यंदा ही परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे.मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएच.डी. पदवी प्राप्त करेपर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यात येते. देशात दहावीच्या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी आरक्षणसुद्धा लागू आहे. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिन करून १0 नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अपलोड करावी. विद्यार्थ्यांनी ८ ते २५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन नियमित आवेदनपत्रे भरणे, २६ ते ३0 आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन विलंब आवेदनपत्रे भरणे, ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत अतिविलंब आवेदनपत्रे भरणे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले आहे.