अकोला, दि. १0- शून्य खर्चाच्या नैसर्गिक, आध्यात्मिक शेतीचा मूलमंत्र देशाला देणार्या सुभाष पाळेकरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. पाळेकर प्रणीत शेतीचे धडे अकोला परिसरातील कास्तकारांना मिळावे, यासाठी अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर, संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट येथे १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसीय शेती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात राज्यभरातील दीडशे शेतकरी येथे हजेरी देणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेतून नीलेश डहेणकर यांनी दिली. याप्रसंगी शरद नाहटे, नीळकंठ मेतकर, राजेश टिकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.केवळ एका गायीपासून मिळणार्या नैसर्गिक खतातून तीस एकर विनाखर्चाची शेती करणे शक्य असल्याचा मंत्र देणार्या पद्मश्री पाळेकर यांनी दिला. त्यांचा प्रयोग आंध्र, तेलंगणा, सिक्कीमसह गुजरातमध्ये सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनीदेखील झिरो बजेट शेतीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील शेतकर्यांनाही याचा लाभ व्हावा, म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही येथे सांगितले गेले. या शिबिरात कास्तकार व जिज्ञासूंना पान पिंपरी, लेंडी पिंपरी, पान तांडा, खारपाणपट्टा आदी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहनही येथे करण्यात आले आहे.गेल्या चौदा वर्षांंपासून नैसर्गिक शेती करणार्या ५0 शेतकर्यांच्या ग्रुपची माहितीही येथे देण्यात आली. सेंद्रिय पद्धतीचे २२ प्रकारचे फळ-धान्याचे पीक घेतल्या जात असल्याचेही येथे सांगितले गेले. अकोट परिसरातील पान मळे आणि खारपाणपट्टय़ातील पीक यावर येथे विशेष मार्गदर्शन केल्या जाणार आहे. मनुष्याला विषमुक्त पौष्टिक अन्न तसेच प्रतिरोधक अन्न या शेतीतून प्राप्त होऊन मानव निरोगी राहतो. या पद्धतीने पाण्याची आणि विजेचीसुद्धा नव्वद टक्के बचत होणे शक्य आहे, अशी माहितीही येथे देण्यात आली.
नैसर्गिक शेती शिबिर १६ पासून अकोटात !
By admin | Published: February 11, 2017 2:32 AM