- विजय शिंदेअकोटःअकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी तथा केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी. एफ) कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या लग्न समारंभात अनोखा आदर्श घालून दिला. या सैनिकाने स्वतःचे लग्नातील आशिर्वादाचे पैसे व वर्हाडी मंडळी करीता सन्मान मदत पेटी ठेवली होती. यावेळी जमा झालेली संपूर्ण रक्कम अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शहीद जवान कैलासराव दहिकर यांच्या कुटुंबाला मदत रूपाने दिली आहे. भारतीय जवानाचा.हा उपक्रम देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे. उपक्रम राबविणारे या जवानाचे नाव शुभम साहेबराव बोरोडे (कोब्रा कमांडो) असे आहे. या नवरदेव जवानाने स्वतः दहा हजार आणि लग्नातील वर वधूच्या आशीर्वाद स्वरूपातील संपूर्ण रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली. सोबतच लग्न समारंभात एक सन्मान पेटीत ठेवत वऱ्हाडी मंडळी व समाजाला मदतीचं आवाहन केले होते. या उपक्रमाला वऱ्हाडी मंडळीनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.शुभम साहेबराव बोरोडे हे सी.आर.पी. एफ बटालियन च्या माध्यमातून देशाची सेवा सध्या बिहार मधील गया येथे करत आहेत. शुभमचे ७ जानेवारी रोजी संध्याकाळी अकोट येथे स्वागत समारंभ पार पडला. लग्न मंडपातील वातावरण अनंदासोबत देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते, लग्नातील आनंदाच्या क्षणातही शुभमने शहीद परिवाराच्या कुटुंबियांसाठी केलेल्या या अनोख्या संकल्पामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी माजी आमदार, संजय गावंडे, शहर पोलीस निरिक्षक संतोष महल्ले, युुवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांनी सदिच्छ भेट दिली.
अकोटच्या नवरदेवाने लग्नात मिळालेली आशीर्वादाची रक्कम दिली शहिदाच्या कुटुंबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 11:34 AM