चंद्र केंद्रस्थानी ठेवून, वर्षभर सूर्याचे भ्रमण एकूण सत्तावीस नक्षत्रांमधून होत असते, असे भारतीय पंचांग सांगते. वर्षाचे ३६५ दिवस २७ नक्षत्रांमध्ये विभागलेले असून, ते विविध १२ राशींच्या अंतर्गत पडतात. सरासरी एका नक्षत्राचा अवधी १३ दिवसांपेक्षा थोडा अधिक असतो. सूर्याचा ‘रोहिणी’ नक्षत्रामध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे ‘नवतपा’. उन्हाळ्यातील सर्वात जास्त तापणारे दिवस असा त्यांचा लौकिक आहे. या दिवसांत हवा आणि जमिनीचे उष्ण तापमान सर्वात जास्त राहते. या नऊ दिवसांचा सरळ संबंध पुढे येणाऱ्या नऊ नक्षत्रांसोबत जोडलेला असतो. नवतपा म्हणजे ९ दिवसांचा काळ असून या ९ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते असे म्हटले जाते. म्हणजेच उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतील उन्हाची कसर या ९ दिवसांत निघते, असे बोलले जाते.
नवतपाचे हे आहे महत्त्व
जर, ‘नवतपा’ कालावधी, खऱ्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला, तर त्या वर्षी पाऊस उत्तम बरसतो, याउलट ज्या दिवशी तापमान कमी असेल, गारवा किंवा पाऊस पडल्यास ते संबंधित नक्षत्र कोरडे किंवा कमी पावसाचे राहत असल्याचे सांगण्यात येते.
पुढे येणारी नऊ नक्षत्रे
मृगशिरा किंवा मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी हस्त, चित्रा आणि स्वाती. स्वाती नक्षत्राची सुरुवात म्हणजे त्या वर्षाकरिता मान्सूनचा कालावधी संपुष्टात आला आहे, असे गृहीत धरले जाते, तेथून मोसमी वारे परतीचा प्रवास सुरू करतात.
नवतपा काळात उत्तरायणातील सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो, त्यामुळे भारतात तापमानवाढ आणि उन्हाळा हा ऋतू उच्चतम स्थितीमध्ये असतो. या वर्षी २०२१ मध्ये नवतपा २५ मेपासून सुरू होत आहेत. नवतपामधील वातावरण आणि पाऊस घेऊन येणारे नक्षत्र यांचा स्थानिक परिणाम प्रत्येक गाव/स्थान/ठिकाणाच्या केंद्रापासून ५० किमीच्या परिघात अनुभवता येतो.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक