अकाेला : अकाेल्याच्या नवरात्र उत्सवाला माेठी परंपरा आहे. दरवर्षी माेठ्या भक्तिभावात साजऱ्या हाेणाऱ्या या उत्सवावर यंदा काेराेनाचे सावट आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनामुळे या उत्सवाला साध्या स्वरूपात साजरे करावे लागणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक मंडळांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असली तरी भक्तिभाव ताेच कायम आहे.
यंदा काेराेनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार देवीची मूर्ती चार फुटांच्या वर नसावी, घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असावी अशा मर्यादा निर्धारित करण्यात आल्या आहेत. सांसकृतिक कार्यक्रम टाळून स्वच्छता, जनजागृतीपर कार्यक्रम राबवावे, आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी टाळावी, ध्वनिप्रदूषण टाळावे, मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास मनाई करण्यात आली आहे. विजयादशमीच्या दिवशी करण्यात येणारा रावणदहणाचा कार्यक्रम सर्व नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा असावा. रावणदहणाकरिता आवश्यक तेवढ्याच व्यक्ती उपस्थित राहण्याच्या सूचना आहे. या संदर्भात सर्व मंडळांनाही कळविण्यात आले आहे.
जय जगदंबा मंडळाकडून ऑनलाइन दर्शन
जवाहरनगरमधील जय जगदंबा नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. काेणाकडूनही वर्गणी मागण्यात आलेली नाही. मंडपात पुजाऱ्या व्यतिरिक्त काेणालाही प्रवेश असणार नाही. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार नाही. भक्तांना देवीच्या दर्शनाचा लाभ फेसबुक, व्हाट्स अॅपसारख्या समाजमाध्यमांच्या द्वारेच मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
योगायोग उत्सव मंडळ रामदासपेठ
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजन तपासणे, सॅनिटायझर मारणे, मास्क लावणे, डिस्टन्स ठेवणे, ५ हजार मास्कचे वाटप, यावर्षी आरोग्य शिबिर होणार आहे, सर्व मंडप रोज सॅनिटाइझ करतील, आचारी व प्रसाद तयार करणारे यांचे ऑक्सिजन व तापमान तपासूनच त्यांना काम देण्यात येईल.
नवरात्रोत्सवातील रोजगार बुडाला
नवरात्राेत्सवादरम्यान हाेणारे विविध कार्यक्रम, गरबा, भक्तांची देवीच्या मंदिरामध्ये हाेणारी गर्दी यामुळे अनेकांना राेजगार मिळत असे. फुलवाले, प्रसाद विक्रेते, मंडप डेकाेरेशन, अशा अनेकांचा राेजगार काेराेनाच्या संकटामुळे बुडाला आहे. दरवर्षी या कालावधीत हाेणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागले.
स्थानिक प्रशासनाचे नियम व अटी
गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयाेजित करण्यात येऊ नये, आरोग्य शिबिरे घ्यावी
मिरवणूक काढू नये, मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी, ऑनलाइन दर्शनासाठी मंडळाने नियोजन करावे.
राज्य शासनाने उत्सव साजरा कसा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांची माहिती सर्व मंडळांपर्यंत पाेहोचविण्यात आली आहे. प्रत्येकाने नियमांचे पालन करूनच शांततेत उत्सव साजरा करावा.
- जी. श्रीधर, पाेलीस अधीक्षक, अकाेला