सिमेंट रस्त्याला तडे; दुरुस्तीची मागणी
अकाेला: शहरातील वर्दळीचा असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकपर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहिन ठरला असून, उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. आकाशवाणीसमाेर रस्त्याला माेठी भेग पडली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रस्त्याची दुरवस्था
अकाेला: शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली, परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना, कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे लाेकप्रतिनीधींनी लक्ष देण्याची मागणी समाेर आली आहे.
रस्त्यालगत फळ विक्री
अकाेला: जीवघेण्या काेराेना विषाणूला पायबंद घालण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत, असे असले, तरी जठारपेठ चाैक, काैलखेड चाैक, तुकाराम चाैक आदी परिसरांत रस्त्यालगत फळ विक्री केली जात आहे.
‘उड्डाणपुलाचे काम निकाली काढा!’
अकाेला: जुने शहरातील डाबकी रेल्वे गेट येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे भिजत घाेंगडे कायम असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अकाेला ते निंबा फाटा, शेगाव, तेल्हारा, तसेच संग्रामपूर तालुक्यात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला खाेळंबा निर्माण झाला असून, या पुलाचे काम तातडीने निकाली काढण्याची मागणी डाबकी राेडवासीयांनी केली आहे.
दिंडी मार्गाचे भिजत घाेंगडे कायम
अकाेला: अकाेला ते गायगाव ते निमकर्दा ते अडाेशी, कडाेशीमार्गे शेगावला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना मागील काही दिवसांपासून दिंडी मार्गाची दुरुस्ती रखडल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांमधून हाेत आहे.