अकोला, दि. २0-शहरातील उद्योजक बियाणी यांचे ८0 हजार रुपये रोख आणि चार धनादेश घेऊन पळून जाणार्या त्यांच्या नोकरास प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्वेता चांडक यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी नोकरास ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.नीलेश श्यामसुंदर बियाणी यांच्या राधा उद्योग, राधा पल्सेस, राधा एंटरप्रायजेस आणि बियाणी फुड्स या प्रतिष्ठानांमधील बँकेचे कामकाज सांभाळण्यासाठी नीलेश पन्नालाल शहा नामक व्यक्ती होता. नेहमीप्रमाणे तो बँकेचे व्यवहार सांभाळत असल्याने नीलेश बियाणी यांनी १८ ऑगस्ट २00९ रोजी त्याला बँकेत जमा करण्यासाठी ८0 हजार रुपये रोख दिले आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी ४ धनादेश दिले. या प्रत्येक धनादेशाद्वारे एक लाख २५ हजार रुपये, ४0 हजार रुपये, ५0 हजार रुपये आणि १ लाख ६0 हजार रुपये बँकेतून काढण्याचे सांगितले होते. नीलेश शहा हा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचे धनादेश आणि ८0 हजार रुपये रोख घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी नीलेश शहा याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४0८ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चांडक यांनी या प्रकरणी नऊ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी नीलेश शहा यास दोषी ठरवित त्याला तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी नोकरास ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून ८ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.प्रथमच नुकसान भरपाईचे आदेशया तांत्रिक मुद्दय़ांनी किचकट असलेल्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तथा सध्या बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख विलास पाटील यांनी केला होता. त्यांनी तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने पोलिसांचा तपास आणि योग्यरीत्या दोषारोपपत्र असल्याचे स्पष्ट केल्यानंतर विश्वासघात करणार्या आरोपीस तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उपअधीक्षक विलास पाटील यांच्या तपासामुळे न्यायालयाने प्रथमच अशा प्रकरणात ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
मालकाचा विश्वासघात करणा-या नोकरास सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 2:34 AM