अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने राज्य सरकार आणि भाजप व शिवसेनेवर टीका करत असतात. कधी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून तर कधी सोशल मीडियातून ते शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकारच्या कामाचं ते आवर्जून कौतुक करत होते. आता त्यांनी एक ट्विट करून आगामी लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार असल्याचा निर्धार मिटकरी यांनी केला आहे.
दरम्यान, अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे आहेत. अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला चोपायची ही संधी मी सोडणार नसल्याचे मिटकरींनी सांगितले. याशिवाय यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मिटकरींनी स्पष्ट केले.
लोकसभा लढवण्याचा मिटकरींचा निर्धार अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही."
अमोल मिटकरी यांनी या आधी केलेल्या ट्विटमधून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती. आशिष शेलार यांचा धनुष्यबाणासोबतचा फोटो ट्विट करून मिटकरींनी भाजपाची खिल्ली उडवली होती. "यालाच म्हणतात 'बाण' नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा.. (फक्त चंद्रा ऐवजी कमळा असे गुणगुणावे)", अशा शब्दांत त्यांनी शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"