अकोला, दि. ९-नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांसमोरअनेक समस्या निर्माण झाल्याने, नोटाबंदीच्या विरोधात एल्गार पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतमालाचे भाव कमालीने घसरले असून, आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहाराची समस्या निर्माण झाली आहे. वेळेवर मजुरी मिळत नसल्याने शेतमजुरांचे हाल होत आहे. शेतकर्यांना रब्बी पिकांसाठी बियाणे, खते व कीटकनाशके मिळण्यासाठी प्रचंड आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हा सहकारी बँक व पतसंस्थांवर आर्थिक निर्बंध घालण्यात आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. काळा पैसा शोधता-शोधता जवळपास ९७ टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याने नोटाबंदीचा निर्णय सपशेल फसला आहे. असा आरोप करत नोटाबंदीमुळे निर्माण झालेली अस्थिरता व अडचणींचा विचार करून, शासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, श्रीकांत पिसे पाटील, राजीव बोचे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, ऋषिकेश पोहरे, डॉ.आशा मिरगे, पद्मा अहेरकर, मंदा देशमुख, कैलाश गोंडचवर, मनोहर दांदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादीचा ‘एल्गार’!
By admin | Published: January 10, 2017 2:29 AM