अकोला: देशातील तसेच राज्यातील जनतेची दिशाभूल करून राज्यात व केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची घोर निाराशा केली असून, या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा २० आॅक्टोबर रोजी निषेध मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभय्या गावंडे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.केंद्रातील युती सरकार आणि राज्यातील भाजप-सेना सरकारच्या आडमुठे धोरण तसेच भरमसाट प्रमाणात लावलेल्या करामुळे डीझल आणि पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यासोबतच एलपीजी गॅसची दामदुप्पट दवाढ करण्यात आली आहे. अनियमित वीजपुरवठा राज्यभर सुरू केलेला असून, अघोषित भारनियमनही सुरू करण्यात आले आहे. यासोबतच शेतकºयांची थट्टा या सरकारने सुरू केली असून, या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. राज्यासह देशात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, ही सामाजिक समस्या बनली आहे. तूर, सोयाबीन, मूग व उडिदाचे गतवर्षी केलेल्या खरेदीचे पैसे अद्याप दिले नसून, ही रक्कम तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, सोबतच बोंडअळीची नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा करण्यात यावी, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार या सर्वच क्षेत्रातील नागरिक राज्य व केंद्र सरकारला वैतागले आहे. जनतेच्या मनात सरकार, सरकारच्या धोरणाविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली असून, या धोरणांचा निषेध करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन सुरू केल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली. हा निषेध मोर्चा माजी मंत्री गुलाबराव गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिरकड, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, प्रदेश पदाधिकारी प्रा. विश्वनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शहराध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, डॉ. आशा मिरगे, मंदा देशमुख, पद्मा अहेरकर, गजानन इंगळे यांच्या मार्गदर्शनात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, श्रीकांत पिसे पाटील, माजी नगरसेवक पंकज गावंडे उपस्थित होते.
भाजप-सेना सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 6:28 PM