मंगळवारी संत भगवानबाबा पुण्यतिथी
अकाेला : श्री संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम १९ जानेवारी रोजी जानाेरकर मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता छाेटेखानी स्वरूपात आयोजित केला आहे. यावेळी भक्तांना पूजन, दर्शन व प्रसादाचा लाभ दिला जाईल. काेराेना नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती वंजारी समाज सेवा फाऊंडेशनने केली आहे.
सर्विस लाईनमध्ये उभारले अतिक्रमण
अकाेला : शहरात दक्षिण झाेन अंतर्गत येणाऱ्या सिंधी कॅम्प, पक्की खाेली, कच्ची खाेली परिसरातील सर्विस लाईनमध्ये स्थानिक रहिवाशांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण उभारले आहे. यामुळे नाल्यांची साफसफाई करताना मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
टॅक्सची माेहीम थंडावली
अकाेला : अकाेलेकरांकडे १३० काेटींचा मालमत्ता कर थकीत असून, त्याची वसुली करण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने १४८ पथकांचे गठन केले हाेते. मागील काही दिवसांपासून ही माेहीम थंडावल्याचे चित्र असून, यामुळे नागरिकांनीसुध्दा कर जमा करण्यास हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे.
खड्डयांमुळे वाहनचालक त्रस्त
अकाेला : निमवाडी लक्झरी बसस्थानक ते पाेलीस मुख्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. लक्झरी बसस्थानकामुळे येथे प्रवाशांची माेठी रेलचेल असते. खड्डयांमुळे अपघात हाेण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शनाचा अभाव
अकाेला : खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील पिकांवरही विविध कीडराेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज असताना या विभागाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
माेहम्मद अली राेडवर वाहतुकीचा खाेळंबा
अकोला : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या माेहम्मद अली राेड भागात गुरूवारी वाहतुकीची कोंडी झाली होती. मुख्य रस्त्यालगत रिक्षा चालकांसह खाद्यपदार्थ, फळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती. अरूंद रस्त्यामुळे काहीकाळ वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शहरात धुरळणीला खाे!
अकोला : शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या हिवताप विभागाने धुरळणी करण्याची गरज आहे. या विभागाने धुरळणीला खाे दिल्याने हा कारभार अकाेलेकरांच्या मुळावर उठला आहे.