- सचिन राऊत
अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. तो आता बदलला जाणार असून, १६ सप्टेंबरपासून ‘११२’ या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ३१ इमर्जन्सी रिस्पाॅन्स व्हेईकल सज्ज करण्यात आलेल्या आहेत. या वाहनांवर माेबाइल डाटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.
जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना १६ सप्टेंबरपासून ११२ हा हेल्पलाइन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा अकाेला जिल्ह्यातील पाेलीस १६ सप्टेंबर राेजी शुभारंभ करणार असून, नागरिकांना आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर मदत मागावी लागणार आहे.
काॅल येताच कळणार लोकेशन
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक १६ सप्टेंबर राेजी कार्यान्वित केला जाणार आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.
३१ चारचाकी, ४८ दुचाकी वाहने
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात नऊ चारचाकी वाहने दाखल झाली हाेती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केल्यानंतर आता ३१ चारचाकी व ४८ दुचाकी अद्ययावत वाहने मिळाली असून, पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजावण्यासाठी मदत होणार आहे.
५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाइज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने करण्यात आली. अकाेल्यात हा प्रकल्प १६ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
- जी. श्रीधर
जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला