अकोला: पाण्याचा साठा मर्यादीत असल्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवु शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने भविष्यात शुध्द वातावरण मिळणे कठिण होवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या पुढील पिढीसाठी पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात जिल्हा नियोजन भवनामध्ये जलसंपदा विभाग अकोला,अकोला सिंचन मंडळ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जल जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अकोला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता जलसंधारण श्री बोके, पाटबंधारे विभागाच्या संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रश्मी देशमुख, पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प अन्वेषन विभागाच्या कार्यकारी अभियंता आशालता महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.जागतीक जलदिन २२ मार्च रोजी साजरा करण्यात येतो या जलदिनाचे औचित्य साधुन जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च पर्यंत शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती अकोला पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन पाटबंधारे विभागाचे अरविंद भोंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी मानले यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी , कर्मचारी,पाणीवापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी व नागरीक उपस्थित होते.पाणी जपून वापरा - जितेंद्र वाघयावर्षी अपुऱ्या पावसाळयामुळे शहराला पाणी पुरवठा करणा-या महान धरणामध्ये अत्यंत अल्प पाणीसाठा आहे. हे लक्षात घेवून शहरवाशीयांनी पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे असे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. जलसप्ताहाच्या निमित्याने मनपाव्दारे वाटर मीटर लावणे , अवैध नळ कनेक्शन वैध करणे तसेच पाईपलाईनेच लिकेज दुरूस्ती करणे यासारखे कामे करण्यात येणार आहे, या कामी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
चित्ररथाचे उद्घाटनजनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. सदर चित्ररथ धरणाच्या लाभ क्षेत्रात व गावा गावात फिरणार आहे. यामुळे जलवापराबाबत जनजागृती होईल अशी अपेक्षा आहे.