अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या लिफ्टला देखभालीची गरज असल्याचे चित्र आहे. लिफ्टकडे रेल्वे प्रशासनाची विशेष नजर नसल्याने लिफ्टच्या दुरुपयोगासह तिथे घाण केली जात आहे. एकीकडे देशात स्वच्छता अभियान राबविले जात असताना दुसरीकडे मात्र लिफ्टमध्ये ठिकठिकाणी थुंकल्याचे चित्र आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय मंडळाच्यावतीने अकोला रेल्वेस्थानकास अनेक सेवा-सुविधा पुरविल्या. वायफाय, लिफ्टच्या सेवा अकोला रेल्वेस्थानकावर सुरू झाल्या; मात्र त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक संपत्तीचा विसर पडताना दिसत आहे. दादºयाच्या पायथ्याशी आणि लिफ्ट थांबते तिथे कुणीही सुरक्षा कर्मचारी नसल्याने या लिफ्टचा दुरुपयोग होत आहे. काही लहान मुले नेहमी या लिफ्टच्या भोवती खेळत असतात. केंद्र शासनाची संपत्ती आपलीच असून, त्याच्या सुरक्षेची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे, याचा विसर अकोलेकरांना पडला आहे. त्यामुळे लक्षावधींच्या या संपत्तीकडे कानाडोळा केला जात आहे.
-लिफ्टचा दुरुपयोग लक्षात घेता अकोला रेल्वेस्थानकावर लवकरच सुरक्षा कर्मचारी नियुक्त होणार आहे. लिफ्टवर कायम लक्ष ठेवण्यासाठी येथे सीसी कॅमेरेदेखील लावल्या गेले आहेत.-आर. पी. ठाकूर, अभियंता, विद्युत्त विभाग, रेल्वे स्टेशन, अकोला.