कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे पत्रकार संघाच्या अधिवेशनात प्रतिपादनअकोला : अलिकडच्या काळात बातम्या देण्याची वाढलेली स्पर्धा ही अनेकदा बातम्यांच विपर्यास करणारी ठरली आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करणारे वार्तांकन केल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाणार नाही त्यासाठी पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आयोजीत एक दिवशीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. ना.फुंडकर म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे कान, नाक डोळे आहेत. पत्रकारामुळे अनेक प्रश्न समोर येतात, सुटतात, त्या प्रश्नांना वाचा फुटते त्यामुळे हे क्षेत्र अतिशय जबाबदारीचे क्षेत्र आहे. अलिकडच्या काळात वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेकदा चुकीचे वार्तांकन होते. मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरणही असेच अर्धसत्यावर आधारीत आहे त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रसार होणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी. पत्रकारांना सरंक्षण व पेन्शन या दोन महत्वाच्या मागण्यांबाबत शासन निश्चीतपणे सकारात्मक असून त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
बातम्यांच्या विपर्यास न करता वस्तुनिष्ठ मुल्यांकनाची गरज
By admin | Published: March 26, 2017 1:56 PM