अकोला: विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संशोधकवृत्ती निर्माण झाली पाहिजे. विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडतील. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले.शिक्षण विभाग पंचायत समिती, अकोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, सुफ्फा इंग्लिश हायस्कूलतर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. विज्ञान प्रदर्शनाचा जीवनातील आव्हानात्मक समस्यांवर वैज्ञानिक उपाय हा मुख्य विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुफ्फा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद फाजील मोहम्मद अब्दुल रज्जाक होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, अनिल मसने, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद साधू, नारखेडे गुरुजी, सुफ्फा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल साबीर अब्दुल कदीर, मुख्याध्यापक अय्युब खान अहमद खान, साबीर हुसैन इकबाल आदी होती. यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मोठी स्वप्ने पाहा आणि ही स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश दिला. विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक व प्राथमिक गटात शहरी भागातून ७४ विज्ञान प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत. ग्रामीण भागातून ३0 विज्ञान प्रतिकृती आल्या असून, लोकसंख्या शिक्षण विषयावर दोन प्रतिकृती, लेबॉरटरी अटेंडंट दोन प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत. विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण बुधवारी दुपारी होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे शहराध्यक्ष ओरा चक्रे यांनी केले. संचालन समिना परवीन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्ष किरण देशमुख, अनिल जोशी, प्रदीप थोरात, फोकमारे, तिवारी, विलास राऊत, पाटील, डोंगरे, तायडे, निखाडे, विजय पजई, कीर्ती देशमुख, सीमा वाठूरकर, सऊद अहमद, अनिस अहमद खान यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)