अकोला : जलजागृतीची व्यापकता वाढवावी लागणार असून, प्रत्येकाने पाण्याचा काटेकोर वापर करावा. पाण्याचे प्रदूषण थांबवावे, मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे जलसंवर्धन अधिक प्रभावीपणे करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामावरही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. या सप्ताहात जलजागृती सप्ताह राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच पश्चिम वºहाडातही जलजागृतीचे काम विविध माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी यांनी लोकमतशी बातचीत करताना दिली.
प्रश्न- जलजागृती सप्ताहात नेमका कोणत्या गोष्टीवर भर राहणार?उत्तर- मुख्यत्वे जलजागृतीवर भर दिला जाणार आहे. यामध्ये पाण्याचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य, फलक गावात, शहरात, जिल्ह्यातील महत्त्वाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.
प्रश्न- पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना काय सांगणार?उत्तर - हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी खर्चून शेती करावी, कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत. पाण्याचे मूल्यवर्धन करावे यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.
प्रश्न- पाण्याचे प्रदूषण कसे रोखाल?उत्तर- पाण्याचे प्रदूषण रोखणे हेदेखील मोठे आव्हान आहे. म्हणूनच आपण जलजागृती करीत आहोत. या विषयावर अधिक भर देण्यात आला आहे. या करिताच जलजागृती सप्ताहात पाण्याशी निगडित महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, एमआयडीसी, कारखाने, औष्णिक वीज केंद्र, प्रदूषण नियंत्रण विभाग, तसेच पाणी बचतीबाबत जागृती करणाºया संस्थाचा या सप्ताहात सहभाग घेत आहोत.
प्रश्न- याव्यतिरिक्त काय करणार?उत्तर- १६ ते २२ मार्चपर्यंत हा सप्ताह आहे. यात चित्ररथ, म्हणी, घोषवाक्य, पाण्याचा पुनर्वापर, पाणीपट्टी भरणा, शासनाच्या नवीन योजना, ड्रीप, इसबिन, पीडीएन, याचा समावेश करण्यात आला आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कार्यकारी अभियंता जिल्ह्यातील एक शाळा दत्तक घेऊन वर्षभर विद्यार्थ्यांना जलजागृतीसंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहे. यामधून भावी जलदूत तयार होण्यासाठी जागृती करणार आहे.तसेच मॉर्निंग वॉक, योगा वर्ग, कीर्तन, आठवडी बाजार, अशा ठिकाणी जलरथाद्वारे भेटून जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण, आणखी संस्था स्थापन करण्यात याव्यात. झालेल्या संस्था कर्यान्वित करण्यात याव्यात, महिला बचत गट करून तसेच अस्तित्वात असलेल्या बचत गटात जलजागृती करण्यात येणार आहे. चांगले काम करणाºयांना गौरविण्यात येणार आहे.