अकोला: अपघातातील जखमी युवकाच्या डोक्यात सुई ठेवण्याच्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांच्या चौकशीमध्ये डोक्यात सुई ठेवल्याचे प्रकरण बनावट असल्याचे उघडकीस येत आहे. सीएस कार्यालयाने खोटी तक्रार केल्याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यास नोटीस बजावून त्याला दोन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. रस्त्यावरील अपघातात जखमी झालेला बाश्रीटाकळी येथील अब्दुल साकीब अब्दुल शब्बीर (२२) याच्या डोक्यावर टाके घालताना वैद्यकीय अधिकार्यांनी डोक्यात सुई ठेवल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याचा प्रकार ३0 जानेवारी रोजी बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात घडला होता. याची तक्रार आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी सुई प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांच्याकडे सोपविली. डॉ. गिरी यांनी युवकावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह ज्या रुग्णालयात अब्दुल साकीबवर शस्त्रक्रिया करून डोक्यातून सुई काढण्यात आली, त्या रुग्णालयातील खासगी डॉक्टरचासुद्धा जबाब नोंदविला होता. युवकाच्या डोक्यात सुई नव्हती, तर ती त्याच्या डोक्याला बांधलेल्या पट्टीतून बाहेर पडल्याचा जबाब डॉ. चितलांगे यांनी नोंदविला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिरी यांनी जखमी युवकाच्या डोक्यातील सुई स्वत:जवळ ठेवणार्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा जबाब नोंदविण्यासाठी आणि सुई घेऊन येण्यासाठी बजावले असता, त्याने तुटलेली सुई न देता पुर्ण दिली. त्याने सुई दाखविली. चौकशी समितीला ही सुई जप्त करण्यासही त्याने मज्जाव केला. डॉ. चितलांगे यांनी दिलेला जबाब आणि पूर्ण असलेली सुई पाहता, काही लोकांनी आर्थिक लाभाच्या दृष्टीनेच ही तक्रार केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे युवकाच्या डोक्यातील सुई ठेवण्याचे प्रकरण बनावट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी, डॉ. संगीता काळे यांच्या चौकशी समितीसमोर उघड झाले आहे.
सुई प्रकरण बनावट असण्याची शक्यता!
By admin | Published: March 10, 2016 2:24 AM