खेट्री : पातूर तालुक्यातील पहाडसिंग येथे विधवा, अपंग, निराधार, दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे दि. ३० ऑगस्ट रोजी निवेदन दिले. वंचित लाभार्थींना तातडीने घरकुलांचा लाभ द्या अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पहाडसिंगी हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असल्याने गावात बहुसंख्य ग्रामस्थ शेतमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. पात्र असूनही हेतुपुरस्पर लाभार्थींना वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. निवेदनावर राहुल गवई, गंगा गवई, समाधान गवई, शोभाबाई सरकटे, वर्धमान सरकटे, पवन गवई, शीतल गवई, बबन सरकटे, वच्छला सरकटे, धम्मदीप इंगळे, गौतम सरकटे, परमिला सरकटे, सुमन मोरे आदी बहुसंख्य ग्रामस्थांच्या स्वक्षऱ्या आहेत.
--
एका घरात दोन दोन घरकुलांचा लाभ देऊन गावातील भूमिहीन, अपंग, विधवा, दारिद्र्यरेषेखाली असे गरजू लाभार्थींना घरकुलापासून वंचित ठेवले आहे. त्यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा इशारा संबंधितांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
- राहुल गवई, ग्रामस्थ पहाडसिंगी
-------------------------
सर्व्हे सर्वांचाच केला जातो, मात्र घरकुलाचा लाभ गरजू लाभार्थींऐवजी श्रीमंत लाभार्थींना दिला जातो, त्यामुळे वंचित असलेल्या लाभार्थींना तातडीने घरकुलाचा लाभ द्यावा.
- शोभाबाई काशीराम सरकटे, पहाडसिंगी