अकोला : महानगरपालिका आयुक्त नीमा अरोरा नव्या जिल्हाधिकारी म्हणून गुरुवार, १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली.
१३ जुलै रोजीच्या शासन आदेशानुसार अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला महानगरपालिका आयुक्तपदी आणि मनपा आयुक्त नीमा अरोरा यांची अकोल्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. त्यानुसार नीमा अरोरा नव्या जिल्हाधिकारी म्हणून १५ जुलै दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्तपदाचा प्रभारही जिल्हाधिकाऱ्यांकडे कायम !
नव्या जिल्हाधिकारी म्हणून नीमा अरोरा यांनी जिल्हाधिकारी पदाचा पद्भार स्वीकारला असून , मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मनपा आयुक्तपदाची सूत्रे अद्याप स्वीकारली नसून, या पदावर ते रुजू होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या मनपा आयुक्तपदाचा प्रभारही नव्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे सध्या कायम आहे.
जिल्हाधिकारी म्हणून गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाचे समाधान आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि कोरोनाच्या दोन लाटांमध्ये जिल्ह्यात प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामावर मी समाधानी आहे, अकोल्यातील नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.
- जितेंद्र पापळकर, मावळते जिल्हाधिकारी
कामांचा प्राधान्यक्रम लवकरच : अरोरा
जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली असून, जिल्हा प्रशासनातील कामाचा प्राधान्यक्रम लवकरच ठरविण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया नव्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.