अकोला : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) येत्या ५ मे रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला केंद्र मागितलेल्या विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील अकोले केंद्र मिळाल्याने ‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ समोर आला आहे.‘नीट’ परीक्षेसाठी यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अकोला केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा प्रवेश अर्ज करताना अकोला केंद्राला प्रथम पसंती दिली व त्यानुसार अर्ज भरले; मात्र विद्यार्थ्यांनी १६ एप्रिल रोजी ‘नेट’द्वारे परीक्षेचे प्रवेशपत्र काढले, तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. अकोल्यातील अनेक विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील अकोले परीक्षा केंद्र मिळाल्याची बाब समोर आली. अकोला केंद्र मागितले असताना अकोले केंद्र मिळाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत असून, यासंदर्भात शासनाने तातडीने दखल घेऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अकोला केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी समृद्धी माधव काळे या विद्यार्थिनीसह इतर परीक्षार्थींनी केली आहे.