लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्यांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. चार महिन्यांचे वेतन तसेच पेन्शन थकीत असल्यामुळे कर्मचार्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाने समस्या निकाली न काढता सफाई कर्मचार्यांवर कारवाईचे सत्र सुरू केल्याचा आरोप करीत थकीत वेतनाच्या मुद्यावर उद्या बुधवारी मनपासमोर ‘भीक मांगो’ आंदोलन छेडणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने पी.बी. भातकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनपातील सेवारत तसेच सेवानवृत्त सफाई कर्मचार्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन आणि सेवानवृत्ती वेतन थकीत आहे. पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे सफाई कर्मचार्यांमध्ये रोष पसरला आहे. दोन आठवड्यानंतर गोगानवमीचा सण असून, त्यानिमित्त अग्रिम रक्कम, महागाई भत्ता देताना प्रशासनाने आखडता हात घेतल्याचा आरोप यावेळी संघटनेचे पदाधिकारी पी.बी. भातकुले यांनी केला. कंत्राटी पद्धतीनुसार सफाई कर्मचार्यांची भरती रद्द करून आस्थापनेवर नवीन सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करावी, साफसफाईसाठी विविध साहित्याचा अभाव असून, त्याचा पुरवठा करावा, शासनाच्या धोरणानुसार सफाई कर्मचार्यांच्या मंजूर पदावर १५ टक्के अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करावी, रजा रोखीकरण, अंशराशीकरणाचा निपटारा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनपा कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा न करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी दिले होते. वित्त व लेखा विभागाने आयुक्तांचे निर्देश धाब्यावर बसवित जुलै महिन्यापर्यंत सुमारे ७६ पेक्षा अधिक कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम दिल्याचा आरोप यावेळी शांताराम निंधाने यांनी केला. यामध्ये एकही सफाई कर्मचारी नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. सफाई कर्मचार्यांचे खच्चीकरण केल्या जात असून, वेतनाच्या मुद्यावर उद्या बुधवारी शहरात भीक मांगो आंदोलन छेडणार असल्याची माहिती पी.बी. भातकुले यांनी दिली. यावेळी विजय सारवान, हरिभाऊ खोडे, धनराज सत्याल, प्रताप सारवान, रमेश गोडाले, मदन धनजे, सोनू पचेरवाल, नारायण मकोरिया, शिवा बोयत, सचिन चावरे, मनोज निंधाने उपस्थित होते.
९ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनप्रशासनाने सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले.
करवाढीचे सर्मथन!मनपाचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कर्मचार्यांच्या वेतनाचा तिढा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनाने करवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सफाई कर्मचारी संघटना सर्मथन करीत असल्याचे पी.बी. भातकुले यांनी सांगितले.