लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नव्याने आधार नोंदणी करण्यात येणार आहे. त्याकरिता शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला असून, शाळेतील पटसंख्या, विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक लाभ, आहार, विविध योजनांचे 'क्रॉस चेकिंग' या माध्यमातून होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या किती याद्वारे शिक्षण विभाग वास्तव जाणून घेणार आहे.केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या, शासनाकडून मिळणारे आहार, शासकीय योजना, शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो अथवा नाही, याची खातरजमा एका क्लिकवर शिक्षण विभागाला कळणार आहे. बहुतांश शाळा, महविद्यालयात विद्यार्थ्यांची पटसंख्या ही बनवाबनवी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे. आता विद्यार्थी पटसंख्यासुद्धा आधार नोंदणीवर कळणार आहे. हल्ली शाळा बंद असल्या तरी आधार कार्ड तपासणीचे निर्देश शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले आहेत. यातून विद्यार्थ्यांना डाटा गोळा करण्याची कार्यवाही शिक्षण विभाग करेल. विद्यार्थ्यांची ओळख कशी करावी, याबाबत कार्यवाही सुरू आहे.
अशी होईल आधार नोंदणीविद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी राज्यात ८१६ आधार नोंदणी संच, आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणधिकाऱ्यांवर याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी, पंचायत समित्यांनाही या मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शिक्षण विभागाकडे करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांची नव्याने नोंदणी होईल. नाव, पत्ता, जन्मतारखेत बदल असल्यास त्याचीही दुरुस्ती या मोहिमेदरम्यान करता येणार आहे.