नया अंदुरा : कारंजा रमजानपुर, हाता, अंदुरा, शिंगोली, निंबा, बहादुरा, निंबी परिसरातील कपाशीवर रसशोषक किडीचा हल्ला वाढल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत. यंदा कपाशीचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
रसशोषक किडींमुळे कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव वाढतो की, काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. गत महिन्यात चांगला पाऊस बरसल्याने पिके बहरली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते;मात्र आता अचानक कपाशी पिकावर रसशोषक किडींच्या हल्ल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कपाशी पिकावर थ्रीप्स, मावा, पांढरीमाशी, हिरवे तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीटक पानातील रस शोषून घेत असल्याने झाडांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, महागड्या कीटकनाशकांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
------------------------
कपाशीवर रसशोषक किडींनी हल्ला चढवला आहे. एका फवारणीसाठी एकरी एक ते दीड हजार खर्च येतो. एवढी महागडी फवारणी करूनही कीटकांचा हल्ला आटोक्यात येते की नाही, हे सांगता येत नाही. कपाशीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार आहे.
-- राजू अढाऊ , नया अंदुरा.
------------------
वरूर जऊळका परिसरातील पावसाअभावी पिके संकटात
अकोट : तालुक्यातील वरूर जऊळका, लोतखेड, खापरवाडी आदी गावात पावसाअभावी पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिकांची वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. परिसरात शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अकोट तालुक्यातील वरुर जऊळका परिसरात पिकांची अवस्था दयनीय आहे. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी विविध प्रकारचे औषधांची फवारणी करीत आहेत. परिसरातील तूर, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सध्या शेती अंतर्गत मशागतीला वेग आला असून , निंदण, डवरणीचे कामे सुरू आहेत.
पाऊस लांबणीवर गेल्याने पिकाची वाढ होत नाही. परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
-रामकृष्ण कात्रे, शेतकरी, वरूर जऊळका.