संतोष येलकर
अकोला : उत्पन्नवाढीची गरज ओळखून, जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मसाला पिकांची कास धरली आहे. एक हजार एकर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत, एक हजार शेतकऱ्यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये मसाला पिकांची लागवड केली. त्यापैकी काही पिकांची काढणी आटोपली आहे, तर काही पिके काढणीला आली आहेत. पारंपरिक पिकांच्या तुलनेत मसाला पिकांतून ५० ते ६० टक्के उत्पन्न वाढणार असल्याने, येत्या काळात जिल्ह्यात मसाला पीक लागवडीत वाढ होऊ शकते.
या पिकांची लागवड !
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कसुरी मेथी, सोप, ओवा, काळे जिरे आदी मसाला पिकांची लागवड केली.
१०२ गावांत लागवड
जिल्ह्यातील १०२ गावांत मसाला पीक लागवड केली आहे. त्यात अकोला तालुका ४२, बार्शीटाकळी ३४ आणि पातूरमधील २६ गावे आहेत.
असे वाढत गेले मसाला पीक क्षेत्र
२२-२३ निरंक
२३-२४ ३० एकर
२४-२५ १,००० एकर