अकोला: नवे जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली.गेल्या २१ जुलै रोजीच्या शासन आदेशानुसार अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची मुंबइ येथील मंत्रालयात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून मुंबइ महानगरपालिकाचे सहआयुक्त अजित कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते रुजू झाले. मावळत्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून अजित कुंभार यांनी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली. जिल्हाधिकारी म्हणून पद्भार स्वीकारताच विविध विभागप्रमुखांची त्यांनी ओळख करुन घेतली.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुखांची बैठक घेत, जिल्हयातील विविध योजना आणि विकासकामांचा आढावादेखिल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेतला.
कार्यालयांना भेटी देवून कामकाजाची घेतली माहितीजिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी भेट देवून, विभागनिहाय कामकाजाची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चाही त्यांनी केली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य!शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हयातील तळागाळापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कृषी विभागाच्या योजनांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न केला जाइल, असेही त्यांनी स्पष्ट केले.