अकाेला : चाेरी, खून, दराेडा, दाेघांमधील वाद, फसवणूक, काैटुंबिक कलह यासारख्या घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करणे, त्याचा शाेध घेणे व तपास करणे हे पाेलिसांचे मुळ कर्तव्य आहे. मात्र केवळ कर्तव्य पार पाडून जबाबदारी पूर्ण झाली अशीच बहुधा वागणूक काही पाेलिसांची असते. मात्र पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकाेला पाेलीस दलाच्या कामकाजात प्रचंड बदल करीत नवे आयाम प्रस्थापित केल्याचे वास्तव आहे. अत्याधुनिक साेयी-सुविधांचा त्यांनी पाेलीस दलाच्या फायद्यासाठी वापर करून कम्युनिटी पाेलिसिंग सुरू केली. त्यामुळे अकाेला पाेलिसांची प्रतिमा माेठ्या प्रमाणात उंचावली असून कामकाजातही गती आली आहे. एवढेच नव्हे तर केवळ काहीच पाेलीस अधिकारी व कर्मचारी काम करतात. इतर काही जण कुचराई करीत असल्याची नेहमीचीच ओरड थांबविण्यासाठी त्यांनी नेल्सन पद्धतीचा अवलंब करीत प्रत्येक पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास समान काम हा फाॅर्म्यूला वापरल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाेप उडाली आहे. अकाेला पाेलीस दलात कधी नव्हे ते बदल करून त्यांनी प्रत्येक पाेलीस अंमलदाराला कामाला लावले आहे.
पेंडिंग गुन्ह्यांची समस्या संपली
शहरासह जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी व गुन्हे यामुळे पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. ही ओरड नेहमी व्हायची, मात्र पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नवनवीन फंडे वापरत अधिकाऱ्यांची कामे करण्याची पद्धत बदलून पेंडिंग गुन्ह्यांचा निपटाराच केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षापासून कामाचा ताण वाढल्याची सुरू असलेली ओरड त्यांनी बंदच केली आहे. गुन्हा पेंडिंग आहे, तपास सुरू आहे या विषयाला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
मूल्यांकन पद्धतीमुळे कामकाज सुधारले
तक्रारकर्त्यांना याेग्य ती वागणूक मिळावी, तसेच प्रत्येक पाेलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा व्हावी, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून प्रथमच पाेलीस ठाण्यांची मूल्यांकन पद्धत सुरू करण्यात आली. त्यासाठी एक पथक गठित करून प्रत्येक पाेलीस स्टेशनच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येते. दर महिन्याला जिल्ह्यातील तीन पाेलीस ठाण्यांना टाॅप थ्री पाेलीस स्टेशन म्हणून गाैरविण्यात येत आहे.