दिवाळीनंतर कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढीस लागला, मात्र नव्या वर्षात मृत्यूचे प्रमाण घटल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात १ हजार ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत मृतांचा आकडा कमी असला, तरी रुग्णसंख्या जास्त आहे. या कालावधीत मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोट तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या शिवाय, अकोला महापालिका कार्यक्षेत्रातही उमरी, गारेक्षण रोड परिसरात कोविड रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारपेठेत वाढती गर्दी आणि बेफिकिरीमुळे कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. डिसेंबर महिन्यात १०५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर २९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
अशी आहे कोविडची स्थिती महिना - पॉझिटिव्ह रुग्ण - मृत्यू - बरे झालेले रुग्ण
फेब्रुवारी - २३८ - २ -१५०
जानेवारी - १०८० - १३ - ८००
डिसेंबर - १०५८ - २९ - १२६६
नोव्हेंबर - १०३३ - १२ - ५७९
ऑक्टोबर - ८९३ - ४५ - २०२४
या कारणांनी कोराेनाचा फैलाव
होम आयसोलेशनमधील रुग्णांकडे दुर्लक्ष.
लक्षणे दिसूनही कोविड चाचणी टाळणे.
फॅमिली डॉक्टरकडून औषधोपचार घेऊन सर्वांमध्ये मिसळणे.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे.
घरोघरी जातील आशा
होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी घरोघरी आशा जाणार असल्याची माहिती आहे. आशांमार्फत होम आयसोलेशनमधील रुग्णांची माहिती तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या आरोग्याविषयी नियमित अद्ययावत माहितीची नोंद करण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोविड नियमांचे पालन करत नसल्यास संंबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
येथे करा कोविड चाचणी
ग्रामीण भागातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र
शहरी भागातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय
महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी जीएमसी, भरतीया रुग्णालय आणि आएएमए सभागृह
जिल्ह्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट केंद्र निदर्शनास येत आहेत. यावर वेळीच अंकुश लावण्यासाठी माहिती मागविण्यात येत असून आवश्यक खबरदारीचे उपाय राबविण्यात येणार आहेत. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, मात्र नागरिकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या सहकार्यानेच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकताे. त्यामुळे लक्षणे दिसताच सर्वप्रथम कोविडची चाचणी करून घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला