राजरत्न सिरसाट, लाेकमत न्यूज नेटवर्क, अकाेला : बीजप्रक्रिया, पिकांचे राेग नियंत्रण व कीड प्रतिकारशक्ती वाढविणारे पर्यावरणपूरक जैविक आता संशाेधन करून द्रव रूपात तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने केलेल्या प्रयाेगाचा चाचणी अहवाल अनुकूल प्राप्त झाला आहे़ लवकरच द्रव रूपातील रायझाे व ॲझाेटाे महाजैविक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा यामागील महाबीजचा प्रयत्न आहे.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांच्या मार्गदर्शनात अकाेल्याच्या पैलपाडा येथील जैविक खते प्रयाेगशाळेत जैविक खतावर संशाेधन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची मागणी व गरज बघून आता यात रायझाेबीयम, पीएसबी, केएमबी, ॲझाेटाे बॅक्टर जिवाणू खतांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण करून द्रवरूप जिवाणू संघ तयार करण्यात आला आहे.
महाबीज, खते नियंत्रण प्रयाेगशाळा, अमरावती व कृषी महाविद्यालय, पुणे या तीनही प्रयाेगशाळांतून दाेन जिवाणू चाचण्यांचे परीक्षण अहवाल अनुकूल, उत्कृष्ट प्राप्त झाले असून, कमी मनुष्यबळात नवीन जैविक उत्पादनावरील संशाेधन यशस्वी ठरले आहे. जैविक संघांना महाजैविक (रायझाे) व महाजैविक (ॲझाेटाे) अशी नावे देण्यात आलेली असून, हे महाजैविक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रकिया सुरू केली जाणार आहेे़
शिफारस कशासाठी?
महाजैविक द्रवरूप जैविक खतांचा संघ असून, यामध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळविणारे व पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा समावेश आहे. हे खत ठिबक सिंचनाषद्वारे प्रवाहित करता येणार आहे. साेयाबीन, एकदल व तृणधान्य गहू, ज्वारी, मका, भात, कापूस, भाजीपाला व फळवर्गीय पिकांसाठी याची शिफारस करण्यात आली आहे.