अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत असलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, गत आठवड्यात या मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, जिल्ह्यात सोमवारपासून नवीन मक्याची उचल जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा गहू व तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण रास्तभाव दुकानांमधून करण्यात येते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटपातील गहू वाटपाचे प्रमाण कमी करून, मका वाटप सुरू करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना १५ मार्चपासून रास्तभाव दुकानांमधून मक्याचे वाटप सुरू करण्यात आले. मात्र, वाटप करण्यात येत असलेला मका निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्याने गत आठवड्यात या निकृष्ट दर्जाच्या मक्याची उचल बंद करण्यात आली, तसेच जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना या मक्याचे वाटप बंद करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मका वाटप करण्यासाठी १२ एप्रिलपासून एरंडोल येथून ६ हजार ५०० क्विंटल नवीन मक्याची उचल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली.
निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वाटप बंद करण्यात आले असून, जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना मक्याचे वाटप करण्यासाठी ६ हजार ५०० क्विंटल नवीन मक्याची उचल एरंडोल येथून सुरू करण्यात आली आहे. गुणवत्ता प्रमाणपत्राची पडताळणी करून नवीन मक्याची उचल सुरू केली आहे.
-बी.यू. काळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी