अकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २८ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्थायी’मधून सत्ताधारी भाजपाचे पाच सदस्य निवृत्त होणार आहेत. यादरम्यान, स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.मनपातील एकूण ८० नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक भाजपचे असून, निकषानुसार मनपा स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. २०१७ मध्ये स्थायी समितीपदी नगरसेवक बाळ टाले यांना संधी दिल्यानंतर २०१८ मध्ये नगरसेवक विशाल इंगळे व २०१९ मध्ये विनोद मापारी यांना सभापदी पदाची जबाबदारी देण्यात आली. या महिन्यात ‘स्थायी’मधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यामध्ये सत्तापक्ष भाजपमधील पाच सदस्यांचा समावेश असून, उर्वरित तीन सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन ८ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपा प्रशासनाने २८ फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्या पृष्ठभूमीवर स्थायी समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपसह इतर राजकीय पक्षांतील इच्छुक नगरसेवकांनी ‘लॉबिंग’सुुरू केल्याची माहिती आहे.