बुलडाणा: ग्रामीण भागातील कानाकोपर्यात एसटी पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन मिडी (मिनी) बस दाखल होणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे दाखल असून, मंजुरी मिळाल्यास चालू वर्षातच ३२ आसनी ५0 नवीन मिडी बस राज्य परिवहन महामंडळ विकत घेणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.खेड्यापाड्यात मोठय़ा आकाराच्या बस पोहोचणे अवघड असल्याने छोट्या बस उपयुक्त ठरतील तसेच ग्रामीण भागातील गावकर्यांना या सेवेचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित नवीन मिडी बस एकूण ३२ आसनी राहणार असून, प्रत्येक बसमागे जवळपास आठ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार ५0 बसमागे महामंडळाच्या महसुलातून तब्बल चार कोटी रुपये रक्कम वजा होणार असल्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागातील नागमोडी वळणावर छोट्या बस चालविणे अधिक सोयीस्कर असून, इंधनातही बचत होईल, शिवाय प्रवासी भार हलका होण्यास मदत होणार आहे. २0१७ च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन ५0 मिडी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणे अपेक्षित आहे. दरम्यान, १ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन असल्याने राज्यभरातील सर्व आगारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जुन्या मिडी बस सुरू राहणार!सद्य:स्थितीला ४४ आसनक्षमता असलेल्या मिडी बस कार्यरत असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव व मेहकर आगार अंतर्गत त्या फेर्या घालत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याच पृष्ठभूमीवर नवीन मिडी बसचा आकार लहान राहणार असून, त्यामार्फत ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे.
एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन मिडी बस
By admin | Published: June 01, 2016 1:02 AM