ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ८ - नाफेडकडून एफएक्यूच्या नावाखाली तूर खरेदी नाकारल्यानंतर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक केली जाते. हा प्रकार सर्रासपणे घडतो. त्यातून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तूर खरेदीचा आशादायी पर्याय शेतकऱ्यांपुढे येत आहे. त्यातून ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था बदलाचे वारेही वाहत आहेत. राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले आहे. तुरीचे उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे. हमीभावाने तूर खरेदी करणारी यंत्रणाच शेतकऱ्यांना पिटाळून लावत आहे. सरासरी दर्जाची गुणवत्ता (एफएक्यू) नसल्याच्या नावाखाली तूर नाकारली जाते. यावर्षी प्रतिक्विंटल ४,६२५ रुपये हमीभाव आहे. त्यावर ४२५ रुपये बोनस आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यावर उपाय म्हणून नवी दिल्ली येथील लघृ कृषक व्यापार संघाने चालू वर्षात तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यस्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यभरात या कंपन्यांकडून खरेदी होणार आहे.
काढणी पश्चात तंत्रज्ञानाअभावी नुकसानतूर पिकाच्या काढणीनंतर त्याची स्वच्छता करणे, प्रतवारी करणे, त्याची वेगवेगळी विक्री करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती नसल्याने हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही, असा तर्क लावला जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे.
अशी तूर होईल खरेदीशेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रात परिसरातील गावांतून येणारी तूर खरेदी केली जाईल. त्यासाठी एफएक्यूची अट आहेच; मात्र तो दर्जा नसलेल्या तुरीचे ग्रेडेशन करण्याची सोय तेथे आहे. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल ८० तर बिगर सभासदांकडून शंभर रुपये आकारले जातील. एफएक्यू दर्जाची तूर हमीभावाने खरेदी केली जाईल. त्या दर्जाची नसलेली तूर शेतकऱ्यांना परत केली जाईल. ती पुन्हा खुल्या बाजारात विकण्याची संधी आहे.
सात दिवसात मिळेल रक्कमशेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीला तूर दिल्यानंतर त्याचा मेल लघू कृषक व्यापार संघाकडे त्याच दिवशी जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा खातेक्रमांकही असेल. त्यावर सात दिवसात शेतकऱ्यांच्या तुरीच्या वजनाची हमीभावाने रक्कम जमा केली जाणार आहे; मात्र हा व्यवहार विश्वासाचा असल्याने शेतकरी किती प्रतीक्षा करतील, यावरच या व्यवहाराचे भवितव्य राहणार आहे.
राज्यात दोनशे कंपन्या करणार खरेदीलघू कृषक व्यापार संघाने राज्यात दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना धान्य खरेदीसाठी सांगितले आहे. त्यामध्ये तुरीचाही समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यात चारशे शेतकरी कंपन्या आहेत. उर्वरित दोनशे कंपन्यांकडून भाजीपाला, फळे खरेदी केली जाणार आहेत. अकोला जिल्ह्यात १३ कंपन्या आहेत. त्यापैकी पाच कंपन्यांकडून तूर खरेदी होत आहे. त्यामध्ये बार्शीटाकळी, अडगाव, अकोट, कपिलेश्वर, कौलखेड जहा. या गावात खरेदी होणार आहे, असे आत्माचे कृषी पणन तज्ज्ञ नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
तज्ज्ञांची शक्यताही हवेत विरलीआठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे सरासरी प्रतिक्विंटल ४,३१० रुपये दर होते. प्रत्यक्षात कमीत कमी ४,००० रुपये प्रतिक्विंटल दरानेच तूर खरेदी करण्यात आली. राज्यातील लातूर ही तुरीची मोठी बाजारपेठ आहे. तेथेही हीच स्थिती आहे. मागील वर्र्षी ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तुरीचे दर होते. उपलब्ध आकडेवारीच्या विश्लेषणावरू न यावर्र्षी ५ ,८०० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती, हे विशेष.
नाफेडद्वारे दोनच केंद्रांवर खरेदीतुरीला हमीभाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होणार आहे. हे सत्य असले तरी नाफेडकडून जिल्ह्यात केवळ दोन केंद्रावर तूर खरेदी होत आहे. अकोट, अकोला याठिकाणी एफएक्यू दर्जा नसलेली तूर नाकारली जात आहे. वाहतूक आणि हमाली खर्च परवडणारा नसल्याने त्याच ठिकाणी व्यापाऱ्यांनाच तूर देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ही पद्धत चांगली आहे. सुरुवातीच्या काळात काही बाबतीत कंपन्यांना अडचणी येतील; मात्र त्यासाठी आत्माकडून त्यांना सातत्याने सहकार्य केले जात आहे. त्यातून कंपन्या उभ्या राहण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावरच त्या उभ्या राहणार आहेत.
- अशोक बाणखेले, प्रकल्प संचालक, आत्मा. अकोला.