- संतोष येलकरअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र शासनामार्फत अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ गत ५ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लाख) आणि ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लाख) अशी एकूण ७००.१६ लाख लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची राज्यात १ फेबु्रवारी २०१४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश करण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आल्यानंतरही इष्टांकपूर्ती होत नसल्याने, नवीन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयात बदल करून अन्न सुरक्षा योजनेमध्ये नवीन पात्र लाभार्थींची निवड करताना १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंतच्या योग्य व गरजू असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांचा विचार करण्यात यावा, असा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ फेबु्रवारी २०१९ रोजी घेण्यात आला. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यात नवीन पात्र गरजू शिधापत्रिकाधारकांची निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करून, त्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यासंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.-राहुल वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.