अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन पंप आणि मशीन बसविण्याचे काम सुरू झाले असून, मुंबई येथील सुहास इलेक्ट्रिकल कंपनीच्या प्रतिनिधींनी दोन नवीन पंप बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. बुधवारी महापालिकेच्या पदाधिकार्यांसह आयुक्त अजय लहाने यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे दोन प्लँट कार्यान्वित आहेत. ६५ एमएलडीच्या प्लँटवर पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप असून, यापैकी चार पंप कालबाह्य झाले आहेत. तसेच २५ एमएलडी प्लँटवरील तीन पंपांपैकी दोन पंप कार्यान्वित असून, एक पंप कालबाह्य झाला आहे. कालबाह्य झालेल्या पंपांची वारंवार दुरुस्ती करून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. अनेकदा विजेचा दाब कमी किंवा जास्त झाल्यामुळे पंप आणि मशीन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले होते. परिणामी शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत होता. यामुळे नवीन पंप आणि मशीन बसविण्याचा एकमेव पर्याय मनपासमोर हो ता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रयत्नातून पंप आणि मशीन खरेदीसाठी शासनाकडून सुमारे १ कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त झाला. पंप खरेदीसाठी मनपाने मजीप्राला नियुक्त केले. पंप-मशीनची खरेदी केल्यानंतर या साहित्याची फिटिंग करण्यासाठी मुंबईतील सुहास इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या प्रतिनिधींची चमू अकोल्यात दाखल झाली. गत आठवडाभरा पासून तांत्रिक दुरुस्तीला सुरुवात केल्यानंतर दोन्ही प्लँटवर प्रत्येकी एक-एक असे एकूण दोन पंप बसविण्यात आले आहेत.
जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन पंप कार्यान्वित
By admin | Published: January 07, 2016 2:30 AM