लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी सूर्यफुलाचे पीडीकेव्ही एसएच-९५२ नवे वाण विकसित केले असून, प्रचलित सूर्यफुलांच्या वाणांपेक्षा नवीन संशोधित सूर्यफुलाचे उत्पादन १५ ते २० टक्के जास्त आहे.देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढण्यासाठी केंद्र शासनाने तेल आयातीचे नवे धोरण ठरविले असून, आयात शुल्कही वाढविले आहे. देशांतर्गत तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरपूर उत्पादन देणारी विविध तेलबिया बियाणे विकसित केली आहेत. सूर्यफूल हे आरोग्यदायी खाद्यतेल तेल असून, खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही ऋतूत घेतले जाते.डॉ. पंदेकृविने पीडीकेव्ही एसएच-२७,०९, वाण विकसित केले असून, गतवर्षी पीडीकेव्ही एसएच-९६४ हे वाण विकसित केले आहे. यावर्षी यात भर घालत पीडीकेव्ही एसएच-९५२ हे नवे सूर्यफूल बियाणे विकसित केले आहे. उत्पादन हेक्टरी १८ क्विंटल आहे. इतर प्रचलित वाणांपेक्षा या वाणांचे उत्पादन १५ ते २० टक्के जास्त आहे. तेलाचा उताराही ४० टक्के असून, ९० दिवसाचे हे पीक आहे.दरम्यान, विदर्भात सूर्यफुलाचे क्षेत्र २.५ लाख हेक्टरवर होते. तथापि, बाजारमूल्य नसल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाचे क्षेत्र कमी करू न इतर पिकांचा पर्याय निवडला आहे. आजमितीस संपूर्ण राज्यात सूर्यफुलाचे क्षेत्र केवळ २० हजार हेक्टरच्या जवळपास आहे.याच कारणामुळे राज्यात तेलबिया पिकांच्या पेरणीत वाढ होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने तेल आयात धोरणात बदल केला आहे.आजमितीस देशात ४० टक्केही तेलबिया पिकांचे उत्पादन होत नसल्याने देशातील नागरिकांची खाद्यतेलाची गरज भागाविण्यासाठी तेलाची आयात करावी लागत आहे.
तेलबिया क्षेत्र वाढीवर भर देण्याचे आला असून, भरघोस उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत. सूर्यफुलाचे नवे वाणही प्रचलित वाणापेक्षा अधिक आहे.- डॉ. विलास भाले, कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.