लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वोपचार रुग्णालयात प्रस्तावित २१० खाटांच्या स्वतंत्र मेडिसीन वॉर्डाच्या इमारतीचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असून, मार्च-२०२० पर्यंत ही इमारत रुग्णसेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाच वॉर्डाच्या मेडिसीन वॉर्डात ‘आयसीयू’ची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याने रुग्णांसाठी सोईचे होणार आहे.सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वाढीव खाटांची मागणी केली जात होती.त्यानुसार, सर्वोपचार रुग्णालय परिसरात २१० खाटांचे स्वतंत्र मेडिसीन वॉर्ड निर्मितीला सुरुवात करण्यात आली होती. या इमारतीचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, दोन ते तीन महिन्यात इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येणार असल्याची शक्यता असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सांगितले. नव्या इमारतीमध्ये मेडिसीनचे पाच वॉर्ड राहणार असून, यामध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्षाचीदेखील निर्मिती करण्यात येणार आहे; परंतु त्याला आणखी अवधी असला, तरी मेडिसीनचे पाच वॉर्ड रुग्णसेवेत लवकरच दाखल होणार आहे.
सेंटर आॅक्सिजनची सुविधानव्या इमारतीमध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्ष प्रस्तावित असून, त्यामध्ये किमान २० खाटांची क्षमता असणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सेंटर आॅक्सिजनची सुविधा राहणार आहे. त्यामुळे आॅक्सिजनचा मुबलक साठा ठेवणे शक्य होणार आहे.
नव्या इमारतीची वैशिष्ट्ये
- मेडिसीनचे पाच स्वतंत्र वॉर्ड
- ‘आयसीयू’मध्ये २० खाटांचा समावेश
- सेंटर आॅक्सिजन प्रणाली
- रुग्ण नातेवाइकांना प्रतीक्षेसाठी स्वतंत्र जागा; गर्दीवर राहणार नियंत्रण
नव्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन ते तीन महिन्यात रुग्णसेवेत दाखल होणार आहे. इमारतीमध्ये २१० खाटा असून, यामध्ये स्वतंत्र आयसीयूदेखील असणार आहे. त्यामुळे रुग्णसेवेची घडी बसविण्यात सोईचे होईल.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला