सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तीळ, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळवाऱ्यामुळे या पिकांचे नुकसान होत आहे. बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. पुढील चार-पाच दिवस अवकाळीचे वातावरण कायम राहणार असून हवामान खात्याने गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रह छायाचित्रानुसार अकोला, वाशिम, बुलडाणा इत्यादी जिल्ह्यासोबत, मध्य प्रदेशच्या राज्य सीमावर्ती तालुक्यात संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत वादळी, अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
--कोट--
हवेतील वाढलेली आर्द्रता रात्री उशिरापर्यंत अशा वादळी पावसाच्या प्रणालीकरिता मदतगार ठरतं आहे. पुढील आठवडाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे.
संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक