अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी राज्यात रोहयो कामांसाठी आता अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागामार्फत १३ जानेवारी रोजी परिपत्रक काढले असून, त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मृदा व जलसंधारण, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि अभिसरण व मूलभूत सुविधांचा विकास इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहयो अंतर्गत कामांसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत भागिदारी करार करून कामांना अधिक चालना देणे शक्य आहे. त्यानुषंगाने रोहयो अंतर्गत कामांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या नियोजन (रोहयो ) विभागामार्फत १३ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यादृष्टीने रोहयो अंतर्गत कामांसाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. असे रोहयो राज्य आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्था, शेतकऱ्यांची घेतली कार्यशाळा!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या उपक्रमांतर्गत रोहयो कामांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि कृषीविषयक उपक्रम राबविणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची कार्यशाळा ११ व १२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे शासनाच्या रोहयो विभागामार्फत घेण्यात आली.