अकोट : अकोट येथील श्याम भुयार यांच्यासोबत इंस्टाग्रामवर बनावट अकाउंटवर मैत्री करून दोघे मिळून भारतात व्यवसाय करू, अशा भूलथापा देत, त्यांच्याकडून ५0 हजार रुपये उकळणाऱ्या नायजेरियातील भामट्यास अकोट पोलिसांनी सोमवारी दिल्लीतील राजू पार्क भागातून अटक केली.श्याम भुयार यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यासोबत नायजेरियातील रहिवासी आरोपी चिमा स्टेनली अलीगबे याने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून संपर्क साधला. त्याच्यासोबत मैत्री केली आणि दोघे मिळून भारतात व्यवसाय करू असा विश्वास संपादन केला आणि पुढे भारतात येत आहे असे सांगत, त्यांच्या व्हॉट्स अॅपवर विमानाचे तिकीट पाठविले आणि सोबत काही मौल्यवान वस्तू आणत असून, त्यासाठी टॅक्स भरायचा आहे, असे सांगत, लेशम पोयल नावाच्या बँक अकाउंटमध्ये वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगून ५0 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यातील आरोपी चिमा स्टेनली अलीगबे याला दिल्लीतून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून दोन स्मार्ट मोबाइल फोन, दोन साधे मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एसडीपीओ सुनील सानवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रणजितसिंह ठाकूर, सुलताना पठाण, विठ्ठल चव्हाण, अंकुश डोबाळे, सायबर विभागाचे प्रशांत केदारे, अतुल अजने यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
नायजेरीयाच्या भामट्याचा अकोटच्या व्यक्तीला ‘आॅनलाईन’ गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:12 PM