अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता, रविवार, २८ मार्चपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत असून, दररोज रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला. त्यानुसार संचारबंदीच्या कालावधीत मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या निर्देशान्वये आणि जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी व संचारबंदी रविवार, २८ मार्चपासून लागू करण्यात येत आहे. दररोज रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून, संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवा आणि कर्तव्यावरील व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या आदेशाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, बाहेर फिरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य सेवा, जीवनावश्यक
वस्तूंची वाहतूक राहणार सुरू
रात्रीच्या संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात केवळ आरोग्य सेवा, ॲम्बुलन्स, औषधींची दुकाने तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि रात्रीच्यावेळी सुरू राहणारे पेट्रोल पंप इत्यादी सेवा सुरू राहणार आहेत.
मुक्त संचार करण्यास ‘यांना’ राहील मुभा
जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदी कालावधीत कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, रेल्वे व लक्झरी बसने उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा, जिल्हाधिकारी व दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली वाहने आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मुक्त संचार करण्यास मुभा राहणार आहे. या व्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.